HOUSE CRACKED DOWN DUE TO STAGNATION OF WATER IN CANSAULIM

Posted On June 25, 2016 By In Local, People, Top Stories


गोवा पायाभूत विकास महामंडळ उठले जनतेच्या जीवावर
भर पावसात नव्या आरोग्य केंद्राचे बांधकाम घेतले हाती
बेअक्कल कारभारामुळं जनतेचा जीव धोक्यात

गोवा पायाभूत विकास महामंडळानं नूतनीकरण केलेल्या फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिराचा भाग अवघ्या दीड महिन्यात कोसळल्याची घटना उघडकीस येऊन अजून २४ तास उलटले नाहीत तोवर वास्कोतील एका भागात महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळं एका खाजगी घराचं कुंपण कोसळलं. या प्रकारामुळं महामंडळाच्या आब्रूची लक्तरं वेशीला टांगली गेलीयेत; मात्र महामंडळाचे अध्यक्ष मुग गिळून गप्प बसलेत. दरम्यान, महामंडळानं असले प्रकार त्वरित थांबवावेत, अशी मागणी ग्रामीण विकासमंत्री एलिना साल्ढाणा यांनी केलीये.
गोवा पायाभूत विकास महामंडळाच्या आडमुठ्या धोरणांमुळं शालेय विद्यार्थ्यांपासून सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याचं गेल्या पंधरा दिवसांतील घटनांमुळं समोर आलंय. महामंडळाच्या अशाच आडमुठ्या धोरणाचा फटका कुठ्ठाळी भागातील नागरिकांना बसत असल्याचं शनिवारी समोर आलं. पावसाळा सुरू झाल्यानंतर महामंडळानं कुठ्ठाळी भागात एका आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम सुरू केलंय. मात्र या कामामुळं परिसराला पाणी तुंबून आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झालाय. इमारतीमुळं पाणी तुंबून राहिल्यानं जमीन भुसभुशीत बनलीये. परिणामी सकाळी बाजूला राहणाऱ्या आशिष वेर्णेकर यांच्या घराचं कुंपण कोसळलं. त्याचबरोबर घराच्या भिंतीला भेगाही पडल्या. आता घर कोसळल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न या कुटुंबाच्या सदस्यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान, मंत्री एलिना साल्ढाणा यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनीदेखील महामंडळाच्या कारभारवर आश्चर्य व्यक्त केलं. कोणताही अनर्थ घडण्याआधी यावर तोडगा काढावा, अशी मागणी साल्ढाणा यांनी व्यक्त केलीये.

राज्यातील सरकारी वास्तुंच्या देखभालीची जबाबदारी गोवा पायाभूत विकास महामंडळाकडे देण्यात आलीये; मात्र ही जबाबदारी पार पाडण्यात महामंडळाला पूर्ण अपयश आलंय. महामंडळाच्या बेजबाबदारपणामुळं जनतेचे प्राण मात्र संकटात सापडलेत. धावशिरे आणि सावईवेरे इथल्या सरकारी शाळेच्या वास्तूंचं दुरुस्तीकाम शालेय वर्ष चालू झाल्यावर आणि पाऊस सुरू झाल्यावर महामंडळानं हाती घेतलं. दोन महिने शाळांना सुट्टी असताना महामंडळानं झोप काढल्या का? अशी चर्चा आता या भागात चालू झालीये. त्यानंतर २२ जून रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीची भिंत कोसळली. अशा बेजबाबदार महामंडळावर जनतेच्या कष्टाचे कोट्यवधी रुपये का उधळे जाताहेत ? असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जाताहे. महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रमोद सावंत मात्र या विषयावर मूग गिळून गप्प बसल्याची टीका नागरिकांतून होताहे.

228
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close