इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
एकाचवेळी १०४ उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा अनोखा विक्रम
PSLV या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रावरून PSLV–C37 सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी या उपग्रहाने आवकाशात झेप घेतली. एकाच वेळी 104 उपग्रह आवकाशात सोडणारा भारत हा पहिलाच देश ठरला. यापूर्वी 37 उपग्रह एकाच रॉपेटमधून आवकाशात सोडण्यात विक्रम रशियाच्या नावे आहे. इस्रोनश जून 2015 मध्ये एकाच वेळी 23 उपग्रह लॉच केले आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. इस्रोच्या पीएसएलव्ही सी-३७ या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे जगातील अनेक देशांचे लक्ष लागले होते. अखेर आपल्या लौकिकाला जागत इस्रोने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखविली. इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ प्रक्षेपक सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी आकाशात झेपावला. उड्डाणापासून ते अंतराळाच्या कक्षेत उपग्रह वेगळे होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात आखल्याप्रमाणे सर्वकाही व्यवस्थित पार पडले आणि इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. या यशस्वी कामगिरीने इस्रोने यापूर्वीचा स्वत:चा एकाचवेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या अमेरिका आणि रशियालाही न जमलेली कामगिरी भारताने करून दाखविली आहे.
या अभूतपूर्व कामगिरीनंतर इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून पीएसएलव्ही सी-३७ आणि कार्टोसॅट उप्रगहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतूक केले. इस्रोची ही उल्लेखनीय कामगिरी देशासाठी आणि भारताच्या अंतराळ शास्रत्रांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मोदींनी सांगितले.
यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. जानेवारी महिन्यात एकाचवेळी ८३ उपग्रह अंतराळात सोडण्याचा इरादा होता. मात्र, ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता आणखी २० उपग्रहांची भर पडली असून आज पीएसएलव्ही सी-३७ एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेने सर्वाधिक २९, तर रशियाने ३७ उपग्रह अवकाशात पाठवले होते. मात्र, इस्रोने आज एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत अंतराळ संशोधन क्षेत्र भारत कोणत्याही विकसित देशापेक्षा मागे नसल्याचे दाखवून दिले. पीएसएलव्ही सी-३७ च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रह होते. यामध्ये अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या सात देशांच्या उपग्रहांचा समावेश होता.