KISKI TOPI KISKE SAR

Posted On June 30, 2016 By In Local, Politics, Top Stories

Arvind Kejriwal Kopel

राजकारण्यांनी सुरू केले टोप्यांचे राजकारण
‘धर्मनिरपेक्ष’ राजकारण्यांच्या मुखवट्यांना आला धार्मिक रंग
अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी चढाओढ सुरू
बहुरूपी राजकारण्यांमुळं गोव्यातील जनतेचं मनोरंजन
सत्तेसाठी घेतली जाताहेत धार्मिक सोंगं

‘धर्मनिरपेक्ष लोकशाही’साठी गळा काढणारे राजकारणी निवडणूक जवळ येताचं धार्मिकतेचं मुखवटे रंगवू लागता, ही काही आता लपून राहिलेली गोष्ट नाही. तोच प्रकार गेल्या आठवड्यापासून गोव्यात सुरू झालाय. गोव्याचे राजकारणी तर यात तरबेज होतेचं, पण यात आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्याच्या राजकारण्यांवर मात केलीये.
फेब्रुवारी २०१७ या महिन्यात गोव्याच्या विधानसभेसाठी निवडणूक होणाराहे. या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी सत्तातूर राजकारणी काय सोंगं घेतली, हे सांगता येणार नाही. त्यातील पहिलं सोंग म्हणजे ‘धार्मिक मुखवट्या’चं. एरव्ही मुखातून धर्मनिरपेक्षतेचं गुराळ गाळणारे राजकारणी निवडणूक जवळ येताचं आपला रंग बदलतात आणि मुखवट्यांना धार्मिक रंग देण्यास सुरुवात करतात. समाज हा धर्माधर्मात विभागला आहे, त्यामुळं त्याला खुश करण्यासाठी ज्या धर्माचा समाज त्या धर्माची टोपी घालून, ‘आपणही तुमच्यातलाच’ असा भ्रम निर्माण करतात. असा रंग रविवारी भाजपचे आमदार विष्णू वाघ यांनी रंगवला होता. वाघ यांनी स्वत:च्या निवासस्थानी ‘इफ्तियार पार्टी’चं आयोजन केलं होतं. या पार्टीत वाघांनी मुस्लिमांची टोपी घालून नमाज आदा केलं.

“केवळ टोप्या घालून समाजात एकता निर्माण होत नाही. विशिष्ट टोपी घालून मी जनतेला मूर्ख बनवणार नाही”, असं सांगून मुस्लिमांची कटोरी टोपी घालण्यास नकार देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाच्या आमदारानं मात्र नेमक मोदी मास्तरांच्या शिकवणीला तिलांजली दिली. आता असं करणारे वाघ हे एकमेव आमदार नाहीत, यापूर्वी ईदच्या दिवशी वीजमंत्री मिलिंद नाईक यांनीदेखील कटोरी टोपी घालून नमाज अदा केलं होतं.

भाजपनं २०१२च्या निवडणुकीत धार्मिकतेचं तंत्र वापरून निवडणुकीत बहुमत मिळवलं. आता पुन्हा २०१७ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचे मंत्री, आमदार धार्मिक मुखवटे रंगवू लागले आहेत, पण या ‘मुखवटे रंगवण्या’च्या तंत्रात आम आदमी पक्षानं भाजपलाही मागं टाकलंय. गोव्यातील धार्मिकतेचं राजकारण बरोबर ओळखलेल्या अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी गोव्यात येऊन त्या तंत्राचा अचूक वापर केला. पहिल्या दिवशी त्यांनी ख्रिश्चन समाजाला खुश करण्यासाठी सांजावची पानाफुलांनी बनवलेली कोपेल डोक्यात घातली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी कटोरी टोपी घालून मुस्लिमांशी संवाद साधला आणि बुधवारी हिंदूंना खुश करण्यासाठी तपोभूमी कुंडई इथं जाऊन ब्रह्मेशानंद स्वामींची भेट घेतली.

आता धार्मिक टोप्या घालून निवडणुकीत किती बहुमत मिळणार, हे येणारा काळचं ठरवेल, पण तूर्तास मात्र गोव्यातील जनतेचं बहुरूपी राजकारण्यांमुळं चांगल मनोरंजन होताहे.

190
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close