MAJOR CLASH BETWEEN TWO GROUPS IN ZUARINAGAR

Posted On March 1, 2017 By In Crime, Local, People, Politics, Top Stories


झुआरीनगरात राजकीय गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर
भाजप, काँग्रेस समर्थकात पुन्हा मारामारी
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा केला तैनात
मंत्री एलिना साल्ढाणा यांनी घेतली धाव

मागच्या महिन्यात मतदानाच्या दिवशी सुरू झालेली झुआरीनगरातील गुंडगिरी अद्यापही थंडावलेली नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झोडण्याची घटना मंगळवारी संध्याकाळीही झुआरीनगरात घडल्यानं हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. या घटनेत स्थानिक पंचायतसदस्य रंगप्पा कमल आणि त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मारहाण करण्यात आली. या घटनेमुळं झुआरीनगरात बराच वेळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित धाव घेऊन फौजफाटा तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी ग्रामीण विकासमंत्री एलिना साल्ढानाही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

झुआरीनगराचे पंचायतसदस्य रंगाप्पा कमाल हे भाजपचे कार्यकर्ते असून त्यांचे मामा आणि कुटुंबच भाजपच्या कार्यात आहे. त्यांच्या मामांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. या हिंसक घटनेमुळे त्या संध्याकाळीही झुआरीनगरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस स्थानकासमोर निदर्शने केलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यावेळी पोलिसांनी गुंडाना अटक करण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं, परंतु सदर गुंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच मंगळवारी संध्याकाळी पुन्हा त्याच काँग्रेसच्या गटातील गुंडांकडून पंच रंगप्पा आणि त्याच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना मारहाण करण्यात आली. यात दोन अल्पवयीन मुले, महिला आणि पंच रंगप्पा यांचे बंधु तसंच अन्य सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या मदतीने जखमींवर कासावलीतील प्राथमीक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या मारहाण प्रकरणात गुंतलेल्यांमध्ये कुठ्ठाळीचे जिल्हा पंचायत सदस्य आणि कुठ्ठाळीचे काँग्रेसचे उमेदवार मारियान रॉड्रिक्स आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्यापैकीही काहीजण जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गट एकमेकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी वेर्णा पोलीस स्थानकात हजर झाले होते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मंत्री एलिना साल्ढाणा घटनास्थळी दाखल झाल्या. मागील पाच वर्षे झुआरीनगरात पूर्ण शांतता होती. परंतु निवडणुकापासून गुंडगिरीला पुन्हा सुरुवात झाली. या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना जर यावेळी अटक करून कडक कारवाई केली असती तर आज असा हल्ला करण्याची त्यांची हिमंत झाली नसती, अशी प्रतिक्रीया एलिना यांनी यावेळी व्यक्त केली.

305
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close