MAN GETS LIFE SENTENCE FOR MURDERING WIFE

Posted On April 1, 2017 By In Crime, Local, Top Stories


स्नेहा शेट्ये खूनप्रकरणी पतीस जन्मठेप
न्यायालयानं गणपत शेट्येला ठोठावली शिक्षा
२६ एप्रिल २०११ रोजी स्नेहाचा झाला होता खून
पत्नीचा खून करून गणपत आला होता पोलिसांना शरण

पत्नीचा धारदार सुर्‍याने खून करणारा गणपत शेट्ये याला म्हापसा न्यायालयात बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. खुनाची ही घटना २६ एप्रिल २०११ रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती. त्यानंतर गणपत स्वत:हून पेडणे पोलिसांना शरण आला होता.

२६ एप्रिल २०११ च्या रात्री आठच्या सुमारास नास्नोडा भरणवाडा पाट्यावर गणपत यानं पत्नी स्नेहा हिचा सुर्‍याने सपासप वार करत खून केला होता. त्यानंतर गणपतने तिथून पोबारा केला. या घटनेचं वृत्त कळताच पोलिसांनी त्वरित धाव घेतली. त्या ठिकाणी पोलिसांना घटनास्थळी चाकू, मोबाईल आणि पर्स आढळली होती. तसंच दूरवर पडलेली सँडलही आढळली होती. त्यावरून स्नेहा हिनं जीव वाचवण्यासाठी बरीच झटापट केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. पर्समधील पॅनकार्डामुळं पोलिसांना तिची ओळख पटली होती. दरम्यान त्याच रात्री उशिरा गणपत हा पेडणे पोलिसांना शरण आला होता. खून केल्यानंतर गणपत हा आपल्या भावाकडे म्हापसा येथे गेला आणि भावाने गणपतला पेडणे पोलिसात नेले होते. पोलिसांनी तिथं गणपतला अटक केली होती.

सदर शेट्ये दांपत्याला तेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घटना घडली त्यावर्षी मलगी सात वर्षांची तर मुलगा चार वर्षांचा होता. स्नेहा ही एका बिनसरकारी संस्थेत कामाला जात होती. दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. सासरची मंडळी स्नेहाला वेडेवाकडे बोलत असल्याने स्नेहा ही सासरी जाण्यास टाळाटाळ करत होती. तर आरोपी गणपत हा तिला तिथेच रहायला जाऊया, असा तगादा लावत होता. यावरून उभयतांमध्ये बराच वादविवाद होत असे. गणपत हा व्यसनी आणि बेकार असल्यामुळं त्याचा तसंच संसाराचा भार स्नेहा उचलत होती. २६ एप्रिल २०११ रोजी संध्याकाळी आपल्या स्कूटरनं गणपत पावणेसहा वाजता स्नेहाला आणण्यास पणजी येथे आला होता. पणजीहून जाताना स्नेहासोबत पुन्हा घरी जाण्याचा विषय त्याने काढला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. नास्नोडा भरणवाड्यावर स्कूटर थांबवून गणपत यानं आपल्याकडील सुरा काढला आणि स्नेहावर सपासप वार केले होते. त्यातच स्नेहाचा जीव गेला. याप्रकरणी शनिवारी म्हापसा न्यायालयानं गणपतला जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

395
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close