[ WATCH STING OPERATION ] MARKETING OFFICIAL OF ENGLISH DAILY DEMANDS PROTECTION MONEY FROM CASINO OPERATORS

Posted On July 4, 2016 By In Business, Crime, Local, People, Top Stories


प्रसारमाध्यमातील विकृती आली चव्हाट्यावर
कॅसिनो मालकांकडे मागतली २५ लाखांची खंडणी
आघाडीच्या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीचा प्रताप
‘मासिक २५ लाख द्या; विरोधातील बातम्या बंद करतो’
वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवस्थापकांची विकृत मागणी
कॅसिनो मालकानेचं स्टिंग ऑपरेशन करून दिले पत्रकारांना
कॅसिनोविरोधात पेटलेल्या आगीवर पोळी भाजून घेण्याचा प्रकार

कॅसिनोविरोधात राज्यात आग पेटली असताना या आगीवर पोळी भाजून घेण्याचे काम गोव्यातील एका विख्यात इंग्रजी वृत्तपत्रानं केल्याचं ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघड झालंय. हा व्हीडीओ खुद्द कॅसिनो व्यवस्थापनानं चित्रित करून पत्रकारांपर्यंत पोहोचावा, याची विशेष काळजी घेतलीये. या वृत्तपत्राच्या जाहिरात विभागाचा व्यवस्थापक ही दलाली करत असताना व्हीडीओमध्ये दिसतंय. पत्रकारितेत शिरलेल्या अशा विकृतीमुळं जनतेचा वृत्तपत्रांवरील विश्वास ढासळत चालाय. त्यामुळं अशा दलालांवर त्वरित कडक कारवाई व्हावी, अशी मागणी गोवेकरांमधून होताहे.
कॅसिनोमुळं गोव्याचं राजकारण गेल्या वीस वर्षांपासून पार ढवळून निघालंय. चोहू बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारला कॅसिनो म्हणजे मोठं वरदान वाटताहेत, तर समाजसेवी संघटनांना कॅसिनो म्हणजे गोव्याच्या संस्कृतीला लागलेला कलंक वाटतोय. सामान्य गोवेकर या कॅसिनोंमुळं भरडून निघालेत. प्रत्येक निवडणुकीत कॅसिनोचा मुद्दा ऐरणीवर असतो. विरोधात असताना कॅसिनो हटवण्याची आश्वासनं दिली जातात; मात्र सत्तेत आल्यावर ती सोयीस्कररित्या विसरली जातात. त्यामुळं येत्या निवडणुकीत सामाजिक संघटनांनी कॅसिनोंच्या विरोधात राज्यभर वणवा पेटवण्याची तयारी केलीये.

कॅसिनोमुळं समाजस्वास्थ्य बिघडलं असताना, त्याला सुधारण्याऐवजी काही गल्लाभरू वृत्तपत्रे त्यातून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सोमवारी समोर आलं. राज्यातील एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्रांचा जाहिरात व्यवस्थापक चक्क या कॅसिनोवाल्यांकडे २५ लाखांची खंडणी मागत असल्याचं ‘स्टिंग ऑपरेशन’मधून समोर आलंय. स्वत: कॅसिनो व्यवस्थापनानं छिपे कॅमेरे लावून हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केलं अन पत्रकारांपर्यंत योग्य तऱ्हेनं पोहोचावं, यासाठी विशेष काळजी घेतली. हे चित्रीकरण फेब्रुवारी २०१५मध्ये झाल्याचा अंदाज आहे. यापूर्वी याचं कॅसिनो आस्थापनानं शिवसेनेची तत्कालीन राज्यप्रमुख उपेंद्र गावकर खंडणी मागत असल्याचं चित्रीकरण करून ‘इन गोवा’कडे दिलं होतं. त्यावेळेसही या वृत्तानं खळबळ माजली होती.

मांडवी नदीतील एका कॅसिनो मालकाच्या कार्यालयातील हे चित्रीकरण आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यामध्ये विख्यात इंग्रजी वृत्तपत्राचा जाहिरात विभागाचा प्रतिनिधी कॅसिनो मालकाकडे चक्क महिन्याला २५ लाखांची खंडणी मागत आहे. मांडवी नदीत गेल्या वर्षी चार कॅसिनो होते. इतर कॅसिनो मालकांनी खंडणी देण्याचं मान्य केल्याचं या कॅसिनो मालकाला सांगितल्यावर त्यानं दुसऱ्या कॅसिनो मालकाशी मोबाईलवरून चर्चा केली. या चर्चेवेळी सर्व पोलखोल झाली. या प्रतिनिधीला वृत्तपत्राच्या जाहिरात विभागानं पाठवल्याचं चर्चेवेळी उघड झालंय. या वृत्तपत्रानं अलीकडेच मराठी आवृत्ती काढली होती; तसंच एक वृत्तवाहिनीही चालू केलीये. या स्टिंग ऑपरेशनमुळं संपूर्ण वृत्तपत्राच्या कारभाराबद्दलचं संशय निर्माण झालाय. अशा बाजारू वृत्तपत्रांमुळंचं पत्रकारितेला कलंक लागलाय. पत्रकारितेची विश्वासहर्ता जपण्यासाठी अशा विकृतींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागलीये.

मात्र जेव्हा कॅसिनो मालकांशी याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कानावर हात ठेवलंय. स्वत:चं हित जपण्यासाठी त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

278
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close