तुये हॉस्पिटलसंदर्भात ठराव मंजूर – गोमेकॉ लिंक आणि ८०% नोकऱ्यांमध्ये पेडणेकरांना प्राधान्य देण्याची मागणी तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे जाहीर सभा आयोजित तुये हॉस्पिटलला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी लिंक करावे आणि हॉस्पिटलमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींपैकी ८० टक्के नोकऱ्या पेडणे तालुक्यातील युवक व युवतींनाच द्याव्यात, या दोन प्रमुख मागण्यांसाठी तुये हॉस्पिटल कृती समितीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत दोन्ही मागण्यांवर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.पेडणे तालुक्यातील तुये येथे बांधण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून, त्याचा लाभ स्थानिक जनतेला व्हावा, या हेतूने स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्था सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र, हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका न घेतल्याने जनतेत नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर कृती समितीने जाहीर सभेत ठाम भूमिका घेत २६ जानेवारी २०२६ पर्यंत हॉस्पिटल सुरू करून त्याला गोमेकॉशी संलग्न करावे, तसेच ८० टक्के नोकऱ्यांमध्ये पेडणेकर तरुणांना प्राधान्य मिळावे, यावर ठराव मंजूर केला. सरकारने या मागण्या गांभीर्याने न घेतल्यास पुढील आंदोलन छेडण्याचा इशाराही सभेत देण्यात आला.
Categories
Civic Issues

