‘माझं घर’ योजनेअंतर्गत २०१६ पूर्वी बांधलेल्या घरांना मालकी हक्क गोव्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक पाऊल उचलत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केली की, देशात पहिल्यांदाच *‘माझं घर’* योजनेअंतर्गत सरकारी जमिनीवर बांधलेली घरे त्यांच्या खऱ्या मालकांच्या नावावर नोंदवली जाणार आहेत. या योजनेचा लाभ केवळ २०१६ पूर्वी बांधलेल्या घरांना मिळणार असून, रहिवाशांना नोंदणीसाठी एकदाच शुल्क भरावे लागेल. या योजनेच्या अर्ज वितरणाचा शुभारंभ म्हापसा बोडगेश्वर मंदिर सभागृहातून झाला, जिथे सरकारी, कोमुनिदाद , खाजगी तसेच २० पॉइंट प्रोग्राम जमिनीवरील घरांसाठी विविध काऊंटर उभारण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार जोशुआ डिसोझा, पालिका सदस्य, तसेच उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी, मामलेदार आणि तलाठी आदी अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले की, सरकार खऱ्या नागरिकांना मालकी हक्क देण्यास कटिबद्ध आहे, मात्र सरकारी जमीन बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा किंवा बांधकाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. ‘माझं घर’ ही योजना गोव्यातील पात्र गृहधारकांना सन्मानाने आणि कायदेशीररित्या घराचा हक्क मिळवून देणारी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
Categories
Political

